भंडारा :- आज भारताने जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. जागतिक स्तरावर देशाचा वाढणारा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या प्रत्येक देशवासीयांच्या विश्वासाचे फलित असल्याचे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.मोदीजीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने भंडारा विधानसभा क्षेत्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीप प्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
उपस्थिताना मार्गदर्शन करताना खा.सुनिल मेंढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला प्रधान सेवक समजतात. 130 कोटी जनतेच्या कल्याणाचा ध्यास मनात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांपूर्वी देशाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. आज त्याचे सकारात्मक परिणाम आपणापुढे आहेत. शेतकरी, महिला, कामगार, युवक आणि युवती अशा सर्वांसाठी कल्याणकारी योजनांची आखणी करून त्याची अंमलबजावणी देशभर केली जात आहे. गरीब कल्याणासाठी राबविलेल्या योजना देशाचे चित्र बदलण्यास कारणीभूत ठरले आहे. या योजनांच्या माध्यमातून आज अनेक कुटुंब समाधानाने जीवन जगत आहेत. हे समाधान म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमाचे फळ असल्याचे खा.मेंढे म्हणाले. केवळ आपल्या विश्वासामुळे आज देशात हे परिवर्तन घडवून आले आहे. जागतिक स्तरावरही देशाचा मान वाढला असून याचे सर्व श्रेय मा.मोदिजींच्या कणखर नेतृत्वाला व जनता जनार्दनाला जाते असेही खासदार मेंढे यांनी सांगितले. जो खंबीर पाठिंबा आपणा मागील नऊ वर्षांपासून पंतप्रधानांवर दाखविला तशाच पाठिंब्याची गरज भविष्यातही आहे असे सांगून देश घडविण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी रहावे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांना केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आ.संजय पुराम, भाजप जिल्हा अध्यक्ष शिवरामजी गिर्हेपुंजे, श्री.रामदास शहारे, महामंत्री चैतन्य उमाळकर, विधानसभा प्रमुख अनुप ढोके, श्री.मुकेश थानथराटे, महामंत्री हेमंत देशमुख, तालुका अध्यक्ष विनोद बांते, शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबार्ते, मयूर बिसेन, आबिद सिद्धिकी, विकास मदनकर, डीम्मू शेख, संतोष त्रिवेदी, सौ.मंजिरी पनवेलकर, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ.माला बगमारे, सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोळकर व आदी उपस्थित होते.