भंडारा: खासदार क्रीडा महोत्सवाने जिल्ह्यातील वातावरण क्रीडामय झाले असताना आज भंडाऱ्यात झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांचा प्रचंड उत्साह अनुभवास आला अगदी लहान मुलांपासून वयाची 72 वर्ष पूर्ण केलेल्या आजी पर्यंतचे स्पर्धक लक्षवेधी ठरले. स्पर्धेतील सहभागी महिलांचा उत्साह पाहता स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्वच स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्याची घोषणा यावेळी खासदारांनी करून टाकली
9 मार्च पासून जिल्ह्यात सुरू झालेल्या खासदार क्रीडा महोत्सव 2023 ने वातावरण ढवळून निघाले आहे. अगदी देशी खेळापासून ते आज-काल तहानभूक हरवून टाकण्यास कारणीभूत ठरत असलेल्या क्रिकेट पर्यंत सर्वच खेळांचा अंतर्भाव या क्रीडा महोत्सवात आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर होत असलेल्या विविध स्पर्धांमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यातील वातावरण चैतन्यमय झाले आहे. याच महोत्सवात तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धाही होत आहेत. मोहाडी आणि तुमसर अशा दोन तालुक्यांमध्ये या मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाठीशी असतानाच आज भंडारा येथे झालेली मॅरेथॉन स्पर्धा लक्षवेधी ठरली.
15 ते 35 आणि 35 च्या वरील वयोगटात महिला आणि पुरुषांसाठी ही स्पर्धा घेतली गेली. या स्पर्धेत लहान मुलांनी सहभाग घेतला होता हे विशेष. पस्तीस वर्षे वयोगटावरील महिलांच्या स्पर्धेत एका 72 वर्षीय आजीने लावलेली दौड लक्षवेधी ठरली. स्पर्धेतील सहभागी इतर स्पर्धकांसाठी आजीचे धावणे प्रोत्साहन देणारे असेच होते. 35 वयोगटावरील पुरुषांच्या स्पर्धेत वयाचे 65 वर्ष लोटलेल्या आजोबांनी मिळवलेला पहिला क्रमांक आहे तेवढाच महत्त्वाचा आहे. स्पर्धेतील महिला स्पर्धकांचा सहभाग लक्षवेधी ठरला. हजारोच्या संख्येत सहभागी महिला आणि पुरुष या स्पर्धकांनी सुरू केलेली स्पर्धा संपवूनच धावण्याला विराम दिला हे विशेष.
दोन तालुक्यांमध्ये झालेल्या स्पर्धेच्या तुलनेत भंडारा तालुक्यातील महिला स्पर्धकांचा सहभाग सर्वाधिक होता. महिलांच्या या उदंड प्रतिसादाचा सकारात्मक दृष्ट्या विचार करता खासदार सुनील मेंढे यांनी पस्तीस वर्षावरील स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहन पर रोख बक्षीस देण्याची घोषणा करून टाकली. स्पर्धेच्या ठिकाणी सुरू असलेल्या झुंबा व्यायाम प्रकाराने अनेकांना भुरळ घातली होती. आजची सकाळ भंडाऱ्यातील धावपटूंसाठी बरेच काही देऊन गेली.
स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थित राहात स्पर्धकांचा उत्साह वाढविला. खा सुनील मेंढे यांनी स्पर्धा पूर्ण करून परत येणाऱ्या स्पर्धकांना व अन्य उपस्थितांंना सुदृढ आरोग्या साठी धावण्याचा संदेश दिला.