
भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्देशानुसार राज्यात शाळा दत्तक योजना राबविण्याचे निर्देश निर्गमित होताच राज्यात सर्व स्तरातून शासनाविरोधात उलट सुलट प्रतिक्रिया येत असून एका युवकाने माझी एक किडनी घ्या व मला मी शिक्षण घेतलेली जिल्हा परिषदेची मराठी शाळा दत्तक द्या या मागणीचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.हा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला असून संबंधित मागणी अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या मागणी अर्जात अर्जदार म्हणून भंडारा तालुक्यातील माडगी येथील जागेश्वर उत्तम पाल यांचे नाव नमुद आहे. जागेश्वर पाल यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण माडगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेतले असल्याचे अर्जात नमूद आहे. शासनाने शाळा दत्तक योजना राबविली असल्याने माडगी येथील जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळा मला चालविण्यासाठी देण्यात यावी मात्र त्यासाठी लागणारी नगद रक्कम माझ्याकडे नसल्याने मी महाराष्ट्र शासनास एक किडनी देण्यास तयार असल्याचे नमूद आहे.एक किडनी विकून रकमेचा भरणा न झाल्यास दुसरी किडनी देण्यास तयार असल्याचेही सांगितले आहे.जागेश्वर पाल यांनी हा मागणी अर्ज मी माझ्या स्व ईच्छेने,अतिशय स्वच्छ विचाराने, कोणतेही नशा पाणी न करता शुद्धीवर राहून संपूर्ण महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या मुलांच्या भविष्याचा शैक्षणिक विचार करून व महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी प्राथमिक शाळांच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.या व्हायरल झालेल्या मागणी अर्जावर १० ऑक्टोबर तारीख लिहिली असून एका कार्यालयाचा आवक जावक चा शिक्का व कर्मचाऱ्यांची तारखीनिशी सही आहे.शासनाने शाळा दत्तक योजना राबविण्याचे शासन निर्देश निर्गमित करताच एका सुज्ञ नागरिकाने स्वतःची किडनी देऊन स्वतः शिक्षण घेतलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा दत्तक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी अर्ज केल्याने हा विषय संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.