सकोली येथील अभय केंद्रात पतीने स्वतःच्या पत्नीवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यावेळी समुपदेशनासाठी आलेल्या महिला समुपदेशन केंद्राच्या संचालिका इंद्रायणी कापगते यांनी प्रसंगावधान राखून महिलेला आरोपीच्या तावडीतून सुटका करून आरोपी पतीला पोलिसांच्या स्वाधीन केल्याने फिर्यादी पत्नीचे जीव वाचवू शकले. इंद्रायणी कापगते यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी इंद्रायणी कापगते यांच्या सत्कार केला.
१२ मार्च रोजी साकोली येथील अभय केंद्रात संरक्षण अधिकारी भांडारकर हे टिकेश्वरी अश्विनकुमार मेश्राम यांच्या तक्रारीवरून त्यांचे पती अश्विनकुमार मेश्राम या दोघांचे समुपदेशन करीत होते. त्यावेळी महिला समुपदेशन केंद्राच्या संचालिका इंद्रायणी कापगते तिथे आल्या होत्या. दरम्यान, समुपदेशन केंद्रात पती-पत्नीचे समुपदेशन करीत असताना अचानक आरोपी पती अश्विनकुमार मेश्राम याने खिशातून ब्लेड काढून पत्नी टिकेश्वरी हिच्यावर हल्ला केला. त्यावेळी इंद्रायणी कापगते यांनी तत्काळ मध्यस्थी करून आरोपी अश्विनकुमार याचे दोन्ही हात पकडून त्याला दुसऱ्या खोलीमध्ये बंद करून बाहेरून दरवाजा लावला. टिकेश्वरी मेश्राम हिला तत्काळ बाहेर जाण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इंद्रायणी कापगते यांनी साकोली पोलिसांना माहिती दिली. तसेच जखमी टिकेश्वरी मेश्राम हिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. इंद्रायणी कापगते यांनी दाखविलेल्या धाडसामुळे टिकेश्वरीचे प्राण वाचू शकले. इंद्रायणी कापगते यांनी केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पोलिस मुख्यालय भंडारा येथे त्यांचे शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. कापगते यांच्या कामगिरीबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.