आयएएस अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणाला जबलपूर पोलिसांनी पकडले आहे. या तरुणाने आपण नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी असल्याचा दावा केला होता. त्याने पदभार स्वीकारताना फोटोही पोस्ट केला होता. त्यामुळे सध्या हे प्रकरण चर्चेत आले आहे. संबंधित तरुणाचे फोटो व्हायरल होताच त्याची माहिती नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तपास केला असता तरुणाचा बनाव पकडला गेला. चौकशीदरम्यान, आरोपीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत फोटो काढत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याचे समोर आले आहे. राहुल गिरी असे आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमध्ये अधिकाऱ्यांसह अनेक राजकारण्यांचे फोटोही सापडले आहेत. एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून तो त्यांच्यासोबत आपली छायाचित्रे काढत असे. राहुल बीएससी पास आहे. आरोपीला आयएएस व्हायचे होते मात्र त्याने तितके शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे तो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोटो एडिट करून आयएएस झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत होता.