भंडारा :- जिल्ह्यातील खाजगी व जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचारी यांच्या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात खा.सुनील मेंढे, माजी आमदार नागो गाणार, भाजप शिक्षक आघाडीचे विदर्भाचे संयोजक डॉ.उल्हास फडके यांच्या उपस्थितीत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेत जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळेची 25 आणि खाजगी शाळांमधील जवळपास 30 प्रकरणे चर्चेला घेण्यात आली. या सर्व प्रकरणांवर नियमानुसार सखोल चर्चा करून मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्या समक्ष सर्व प्रकरणे शिक्षणाधिकारी संजय डोरलीकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनटक्के यांनी तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले. शिक्षकांचे एक तारखेला वेतन, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक पदोन्नती भरती, पदवीधर शिक्षक पदोन्नती, 2005 नोव्हेबर पूर्वी सेवेत आलेल्या व नंतर जीपीएफ खाते मिळालेल्या शिक्षकांची डीसीपीएस मधील कपातीची रक्कम जीपीएफ खात्यात वळती करणे, वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव, सेवानिवृत्त शिक्षकांना गट विमा लाभ देणे, भविष्य निर्वाह निधी परतावा, ना परतावा प्रकरणे विशिष्ट कालावधीत निकाली काढणे, सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन विक्री, सेवानिवृत्ती उपदान, प्रवास भत्ता, सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांना दुसरा व तिसरा हप्ता रोखीने देणे अशा अनेक विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली.कार्यालयात संघटनेच्या कामाने येणाऱ्या शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांचा सन्मान व तसेच अन्य शिक्षक, मुख्याध्यापकांचा सन्मान कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून जपला जावा. कोणतीही अपमान जनक कृती होता कामा नये असे देखिल सांगण्यात आले.शिक्षकांच्या अडचणी निकाली काढण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राधान्याने पुढाकार घ्यावा. हेतू पुरस्सर कुणालाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये. नियमानुसार काम करावी असे निर्देश यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी दिले.यावेळी शिक्षक परिषदेचे राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष अंगेश बेहलपाडे, कार्यवाह सुभाष गोतमारे, सुधीर वारकर, उच्च माध्यमिक विभागाचे कार्यवाह पितांबर उरकुडे, सेवकराम कुथे, विजय करंडे, सुभाष गरपडे, अविनाश पाठक, महादेव तेलमासरे, सचिन तिरपुडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.