दिव्यांग व्यक्तींना रेल्वे विभागाकडून प्रवासात दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी ओळखपत्र तयार करण्याच्या दृष्टीने विशेष शिबिराचे आयोजन 24 जानेवारी रोजी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर करण्यात आले आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून शिबिर घेतले जात आहे.
रेल्वे चा प्रवास करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना रेल्वे विभागाकडून प्रवास भाड्यात व इतर सवलती दिल्या जातात. त्यासाठी रेल्वे विभागाच्या ओळखपत्राची आवश्यकता असते. दिव्यांगांना या सुविधा मिळाव्यात म्हणून ओळखपत्र तयार करण्याच्या दृष्टीने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या वतीने भंडारा रोड रेल्वे स्थानकावर असे शिबीर घेतले जावे यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी रेल्वे विभागाच्या बैठकांमध्ये विशेष आग्रह धरला होता. याच अनुषंगाने 24 जानेवारी रोजी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळात हे शिबिर घेतले जात आहे. यावेळी रेल्वेत प्रवास करण्यासाठी ओळखपत्र दिले जाणार आहे. दिव्यांग ओळखपत्र, दोन फोटो, आधार कार्ड, टीसी, व अन्य कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार सुनील मेंढे व रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.